नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या अमेरिकेच्या हवाईतळावर क्षेपणास्त्राचा मारा केल्यानंतर इराणच्या पवित्र्यात नरमाई आली आहे. आणि ही एक चांगली घटना आहे, असं अमेरिकेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते व्हाईट हाऊसमधून दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
इरबील आणि अल असद इथल्या तळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कुणाही अमेरिकी किंवा इराकी व्यक्तीचा बळी गेला नाही. आणि झालेलं नुकसानही किरकोळ आहे, असं ते म्हणाले. इराणचे नेतृत्व आणि जनता यांचं भवितव्य उज्वल असावं, त्यांची भरभराट व्हावी, आणि या देशाचे इतर देशांशी जिव्हाळयाचे संबंध असावेत, अशी अमेरिकेची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेकडे मोठी लष्करी ताकद आहे, परंतू त्याचा उपयोग केलाच पाहिजे, असं नाही असं सांगून ट्रम्प यांनी इराणवरचे आर्थिक निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत दिले. इराणनं महत्त्वाकांक्षी अणू कार्यक्रम सोडावा आणि दहशतवादाला साथ देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांनी क्षेपणास्त्र हल्ला ही केवळ एक चपराक असून अमेरिकेनं त्वरीत त्या क्षेत्रातून निघून जावं, असं म्हटलं आहे.
इराणच्या दाव्यानुसार या क्षेपणास्त्र हल्ल्यात 80 अमेरिकी सैनिक ठार झाले, तर 200 जखमी झाले. काल संध्याकाळी देखील बगदादमधे अमेरिकी दूतावास असलेल्या भागात दोन रॉकेटस् पडली मात्र त्यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं वृत्त आहे.