नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या नव्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात खरौना मैदानावर झालेल्या सार्वजनिक सभेत ते बोलत होते.

ही सभा नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी भाजपानं हाती घेतलेल्या मोहिमेचाच एक भाग आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. या कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार अनेक पीडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षांनी त्यावरुन जनतेची दिशाभूल करु नये, असं शहा यांनी सांगितलं.

यावर्षी होणा-या बिहार विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील आणि या निवडणुकीत भाजपा आणि संयुक्त जनता दल एकत्रितपणे लढवतील,असं ते म्हणाले.