भोसरी : मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी मोशीतील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा मोशी डेपोत टाकला जात आहे. यामुळे या परिसरात कमालीची दुर्गंधी पसरत आहे. या डेपोतील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मोशीसह चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडीसह इंद्रायणीनगर, संतनगर परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

हे कमी की काय, म्हणून शासनाच्या मोशी येथील मालकीच्या जागेत पुण्याचा कचरा आणून टाकण्याच्या हालचालींनी चांगलाच वेग घेतला आहे.

याला विरोध करण्यासाठी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी बैठक घेतली होती. या बैठकीत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी दि.9 गाव बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.

मोशीत पुण्याचा कचरा नकोच, अशी मोशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे. मोशीतील नागेश्‍वर महाराज मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. त्यामध्ये आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांनी ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली. तसेच पुण्याचा कचरा मोशीत टाकण्यास विरोध दर्शविला.