एसएनडीटी विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ

मुंबई : महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडस हे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुख या भूमिकेतून अधिक सक्षम असले पाहिजे. सामाजिक,धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात सुवर्णपदक मिळवले तरी कुटुंबात प्रमुख भूमिकेतून सुवर्णपदकापेक्षा मोठी जबाबदारी महिलांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 69 वा  वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरु  प्रा. शशिकला वंजारी, संबंधित प्राध्यापक उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, समाजव्यवस्थेमध्ये भविष्याचा विचार करुन वर्तमानामध्ये वावरले पाहिजे. त्याचबरोबर आपला इतिहास आपण विसरु नये. आजची तरुण पिढी मोबाईलचा अतिवापर करत असल्याने त्यांचे पर्यटन, शिक्षण मोबाईलवरच सुरु असते. त्यामुळे मुलांचे फिरणे, अभ्यास करणे, गडकिल्ले यांची पाहणी करणे हे कमी झालेले आहे. मोबाईलचा योग्य वापर करावा. पण आपला जास्तीचा वेळ मोबाईलवर वाया घालवू नये. महिलांनी उच्च ध्येय ठेवून आपली वाटचाल करावी, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

दरम्यान राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिला मेढे, सुप्रसिद्ध लेखिका व कवी अरुणा ढेरे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (हॉनोरिस कार्स) पदवी प्रदान करण्यात आली.