पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा
मुंबई : राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-2 राबविण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली.
मराठवाडा वॉटर ग्रीड
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी मराठवाडा वॉडर ग्रीड हा अत्यंत उपयुक्त प्रकल्प आहे. परंतु हे करीत असताना कृषी व्यवसाय व पिण्याचे पाणी यांचा समतोल राखला जावा. मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि 11 धरणांना जोडणाऱ्या प्रकल्पामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.
जल जीवन मिशन राबविणार
प्रत्येक घरात घरगुती नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. पाणी पुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ठोक पाणीपुरवठ्याचे राज्यात एकसारखे दर निश्चित करण्याचे धोरण ठरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.
जल पुनर्भरण योजना राबवावी
भूगर्भातील पाणी साठवून ठेवणाऱ्या जलधरांची निश्चिती करुन विविध जल पुनर्भरण योजना राबविण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे उद्भव पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन योजनांचा प्रस्ताव सादर करा असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांकडे पुरेसा निधी नसतो. तो उपलब्ध करुन द्यावा, त्यासाठी मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम टप्पा-2 मध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद करावी. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमातील योजनेच्या 10 टक्के लोकवर्गणी घेण्याचे प्रस्तावित आहे. नागरी व ग्रामीण भागातील योजनांना ठोक स्वरुपात पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार कराव्यात, असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे, उपसचिव अभय महाजन, उपसचिव निधी चौधरी व पाणीपुरवठा विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.