नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रवरुप नैसर्गिक वायू आणि वीज हे भविष्यातल्या वापरासाठी अत्यंत योग्य इंधन प्रकार आहेत, कारण ते स्वस्त आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
‘वाहतूक व्यवस्थेसाठी उपयुक्त ठरणारी भविष्यातले इंधन प्रकार’ या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित परिषदेत ते बोलत होते. वाहतूक व्यवस्थेसाठी पारंपरिक इंधनाऐवजी जैव-इंधनांचा वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे असं ते म्हणाले.
नागरिकांनी प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकधिक वापर करावा असं आवाहनही त्यांनी केलं. ब्रॉड गेज मेट्रो हा पारंपारिक प्रवास पद्धतीसाठी उत्तम पर्याय ठरु शकेल असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.






