मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून, प्रदर्शन 7 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.

अणुऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने संयुक्तरित्या या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दोन महिन्यांच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञार्थी, युवा उदयोन्मुख वैज्ञानिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, अध्यापक आणि उद्योजक यांना सामायिक मंच उपलब्ध झाला.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना विविध घटकांना पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी प्रथमच आयोजित या प्रदर्शनाचा कालावधी दोन महिन्यांचा ठेवण्यात आला. केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचा आकडा शेवटच्या दिवसापर्यंत म्हणून 7 जुलैपर्यंत 2 लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

प्रदर्शनात भारतस्थित ‘न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी’, लिगो, 30 मीटर टेलिस्कोप (टीएमटी) ही प्रमुख आकर्षणे ठरत आहेत.

अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि आयसीपीडी, एनसीपीडब्ल्यू, डीएई यांचे प्रमुख आणि सर्वोच्च समितीचे संयोजक अरुण श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. मूलभूत संशोधनाचे परिणाम आणि मूल्य अधोरेखित करण्यात विज्ञान समागम यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनामुळे विद्यार्थी, अभ्यासक आणि उद्योजक यांना सामायिक, वैशिष्ट्यपूर्ण मंच उपलब्ध झाला. याबाबतची माहिती लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवल्याबद्दल त्यांनी प्रसार माध्यमांचे आभार मानले. याबाबतची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात माध्यमे यशस्वी झाल्याचे प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या संख्येवरुन दिसून येत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

मुंबईनंतर 29 जुलै 2019 ला बंगळुरु येथे विज्ञान समागम आयोजित केले जाणार आहे. विश्वेश्वरच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालयात ते 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर कोलकाता इथल्या सायन्स सिटी येथे 4 नोव्हेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 ते आयोजित करण्यात येईल. शेवटच्या टप्प्यात प्रदर्शन नवी दिल्लीला पोहोचेल. राष्ट्रीय विज्ञान केंद्रात 21 जानेवारी 2020 ते 20 मार्च 2020 पर्यंत सुरु राहील. त्यानंतर नवी दिल्लीत हे प्रदर्शन कायमस्वरुपी राहील. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद प्रदर्शनाचे व्यवस्थापन करेल.

मुंबईत 7 जुलै 2019 पर्यंत शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसांसह सर्व दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रदर्शन खुले राहील.