नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रसार रोखण्यासाठी घातलेले निर्बंध वेळेआधीच उठवले तर कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं आणि धोकादायक होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.  बाधित देशांमध्ये हे निर्बंध टप्प्याटप्प्यानं विचापूर्वक शिथिल करण्यासाठीच्या धोरणावर संघटना विचार करत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

सध्या जगभरात कोरोनानं दगावलेल्यांची संख्या एक लाखावर गेली आहे. चीनमध्ये गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात पहिला रूग्णआढळल्यानंतर आज जगभरात कोरोनाबाधितांची संख्या १७ लाखाच्या आसपास पोहोचली आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

उपचारानंतर ३ लाख ७७ हजार लोक बरे झाले आहेत. युरोपातल्या स्पेन, ईटली, जर्मनी आणि फ्रान्समध्ये या विषाणूच्या प्रसारात किंचित घट झाली आहे. याचं स्वागत करत असतांनाच, अफ्रिकी देशांमधल्या ग्रामीण भागात या विषाणूच्या वाढत्या संक्रमणाबाबत संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे. जगातल्या १६ देशात या विषाणूचे समूह संक्रमण दिसून येत असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं.