नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, तसंच समतेच्या  विचारासह सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची दिशा देणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. जातीव्यवस्थेविरोधात त्यांनी दिलेला लढा आणि महिलांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपराष्ट्र्पतींनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहताना व्यक्त केला.
सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच महात्मा फुले यांच्या विचारांचं, कार्याचं स्मरण करावं. जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.