नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपर्यंत १९३ देशांमधल्या २३ लाख ३४ हजार २३० हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. या आजारानं जगभरात आजपर्यंत १ लाख ६० हजार ६८५ जण दगावले आहेत, तर ५ लाख १८ हजार ९०० जण उपचारानंतर कोरोनामुक्तही झाले असल्याचंही या संदर्भातल्या वृत्तात म्हटलं आहे.
अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसत असून, तिथे ७ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे, तर ३९ हजारांहून अधिकजण या आजारानं दगावले आहेत. अमेरिकेपाठोपाठ युरोपात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. युरोपीय देशांमध्ये एकूण ११ लाख ५३ हजार १४८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तिथे इटलीत २३ हजार २२७, स्पेनमध्ये २० हजार ४५३, फ्रान्समध्ये १९ हजार ३२३ आणि ब्रिटनमध्ये १५ हजार ४६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
या आजाराचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आजपर्यंत ८२ हजार ७३५ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ४ हजार ६३२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती चीननं दिली असल्याचं वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.