स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी केला उहापोह
पुणे- लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर म्हणून पुणे शहराचा शोध या विषयावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने आयोजित कार्यशाळेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०० हून अधिक तज्ञांनी सहभाग नोंदवला. स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी यावेळी विचार मांडले.
नीती आयोग आणि स्मार्ट सिटी मिशन, तसेच एल अँड टी कंस्ट्रक्शन, नॅसकॉम, पुणे महानगरपालिका (पीएमसी) यांच्या सहाय्याने व सिटी फ्यूचर्स, न्यू साउथ वेल्स विद्यापीठ, सिडनी आणि प्लस अलायन्स यांच्याशी सह-भागीदारीत पुणे स्मार्ट सिटीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
यावेळी पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, मनोजित बोस उपस्थित होते. किंग्ज कॉलेज लंडन, अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी व न्यू साउथ वेल्स विद्यापीठ येथील तज्ञांसह चर्चासत्रात सहभाग नोंदवला.
डॉ. माशेलकर म्हणाले, “प्रतिभा, तंत्रज्ञान आणि सहिष्णुता हे तीन घटक आहेत ज्यामुळे इतर शहरांपेक्षा पुणे शहराची वेगळी ओळख आहे. या घटकांमुळे जागतिक संस्थांना काम करण्यासाठी पुणे हे अनुकूल ठिकाण वाटते.”
डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प राबवताना कमांड अँड कंट्रोल सेंटरशी संपूर्ण माहितीचे एकात्मीकरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वेगवेगळ्या दिशांमध्ये काम करणाऱ्या शासकीय संस्थांचा समन्वय साधला जातो. म्हणून इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर हा स्मार्ट प्रकल्पांसाठी महत्त्वाचा दुवा आहे.”
प्रशासन आणि नगरपालिका सेवांमध्ये परिवर्तनासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण आणि शाश्वत वापरात पुणे शहर आघाडीवर राहिले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी करताना सिडनीच्या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठासोबत (यूएनएसडब्लू) आपल्या डिजिटल नवनिर्मितीचा अजेंडा पुणे स्मार्ट सिटी राबवत आहे. पुण्यातील विकासाच्या संधींचा विचार करण्यासाठी “लिव्हिंग लॅब” कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.