नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार व्यापक प्रमाणावर आर्थिक उन्नतीचा विचार करत असून देश विकासाच्या आणि उन्नतीच्या दिशेनं पावलं टाकत असून भारतात गुंतवणूक करण्याची हीच चांगली वेळ आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत एका खाजगी वृत्तपत्राच्या आर्थिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशात सुरु असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेबाबत त्यांनी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. देशात दररोज ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येएवढ्या लोकांचं लसीकरण होत असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सिनेमा संग्रहालयाला भेट दिली. राष्ट्रीय सिनेमा संग्रहालय हा भारताचा सांस्कृतिक ठेवा असून मुंबईतल्या आणि मुंबईत येणाऱ्या लोकांनी याला नक्कीच भेट दिली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं. ज्यांना भारतीय सिनेमाची आवड आहे त्यांनी आपल्या मुंबई भेटीत या ठिकाणी आलं पाहिजे. असंही ते म्हणाले. या संग्रहालयात प्रेक्षकांना भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांचा प्रवास घडवण्यात येतो. जगातले सर्वाधिक चित्रपट भारतात निर्माण होतात असं सांगतांनाचं भारतीय सिनेमा ही भारताची सौम्य शक्ती असून करमणूकीच्या माध्यमातून केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या रसिकांच्या हृदयावर राज्य करण्याची क्षमता त्यामध्ये आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.