नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक भर पडली. 4 हजार 987 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 90 हजार 927 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोविड 19 ने 120 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आता 2हजार 872 झाला आहे. सध्या 53 हजार946 रुग्णांवर उपचार सुरु असून 34 हजार 108 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता 37 पूर्णांक 51 शतांश टक्के झालं आहे.

राज्यात काल आणखी एक हजार 606 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा 30 हजार 706 झाला आहे. काल या आजारानं राज्यात 67 रुग्णांचा  मृत्यू झाला, राज्यात एकूण मृतांचा आकडा एक हजार 135 झाला आहे. तर काल 524 रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले. राज्यात आतापर्यंत सात हजार 88 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.

पालघर जिल्ह्यात आज ७ नवे कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी ५ जण वसई तालुक्यात पोमन इथले रहिवासी असून ते एकाच कुटुंबातले आहेत. अन्य दोन रुग्णांपैकी एक जण अर्नाळा इथला  तर एक महिला  बोईसरमध्ये बेटेगाव इथली रहिवासी आहे.

रायगड जिल्ह्यात आज २२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून यापैकी १२ जण पनवेल मनपा, ८ पनवेल ग्रामीण तर , उरण आणि माणगाव इथला प्रत्येकी एक जण आहे.  जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४८१ वर पोहोचली असून,  आज २७ जण बरे होऊन घरी गेले.  .

सोलापुरात आज १४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं तिथे, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७८वर पोचली आहे. या आजारानं जिल्ह्यात आत्तापर्यंत २४ जण दगावले असून, १५० जण उपचारानंतर बरे होऊन घरीही परतले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आज तेरा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं तिथल्या बाधितांची एकूण संख्या ९७ झाली आहे. यातले नऊजण यात्रेकरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २६ रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत.

भंडारा जिल्ह्यातही २ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. हे दोघेही पुण्याहून आले होते अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात आज चार नवे रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले. यापैकी ३ जण कडेगाव तालुक्यातले तर एक जण लक्ष्मीनगर इथला रहिवासी आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५० वर पोहोचली असून आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला तर १७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

बीड जिल्ह्यात आज कोरोनाचे २ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी एक जण गेवराई तालुक्यातला तर दुसरा माजलगाव तालुक्यातला आहे. गेवराई तालुक्यातला रुग्ण मुंबईहून तर माजलगाव इथला रुग्ण पुण्याहून आला आहे. हे दोन्ही रुग्ण परवानगी घेऊन आले होते का, या गोष्टीचा , तसंच  त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा तपास सुरु आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या आणखी तीन कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या २९ पर्यंत पोचली आहे.

कोल्हापूरात आणखी ४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात एक महिला तर ३ पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात कालही ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यामुळे आता जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ४० झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आज १ तर काल २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या या नव्या रुग्णांसह एकूण ५ जणांवर उपचार सुरु आहेत, तर २३ जण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडलं आहे. तर जिल्ह्यात आत्तापर्यंत १ जण या आजारानं दगावला आहे.

साताऱ्यातले चार कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.