नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही, तसंच ही जंतुनाशकं आरोग्यासाठी घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या  जगात अनेक देश सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी फवारे मारत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं पत्रक जारी केलं आहे.

कोविड १९ जेवढा काळ एखाद्या पृष्ठभागावर, तेवढा काळ या जंतुनाशकांचा प्रभाव राहत नाही, तसंच रस्त्यांच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होत नाही असं यात म्हटलं आहे.

कुठल्याही परिसथितीत माणसावर जंतुनाशकाचा फवारा मारणं हे पूर्णपणे अयोग्य असून असं केल्यानं त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला बाधा पोहोचते, तसंच त्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता कमी होत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.