अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परीस्थितीत जूट कमिशनर यांच्याकडून बारदान उपलब्ध न झाल्याने भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक असलेले १० लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेड मार्फत भरडधान्य केंद्रावर सदर बारदान तातडीने पाठविण्यात येत आहे. त्यामुळे बारदानाअभावी रखडलेली मकासह इतर भरडधान्य जलद गतीने खरेदी केले जाईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
रब्बीतील भरड धान्य खरेदीसाठी आवश्यक असणारे बारदान राज्य सरकार केंद्र शासनाच्या जुट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेत असते. त्यानुसार केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे बारदान खरेदीसाठी राज्य शासनाने आतापर्यंत ५८.५० कोटी वेळोवेळी अदा केले आहेत. परंतु कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा बारदान उत्पादनावर परिणाम झाला असून अद्याप जुट कमिशनर यांचेकडून राज्य शासनाला बारदानाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असलेला १० लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नाफेडला ५.८४ कोटी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला अग्रीम देण्यात आले असून नाफेडकडून प्रत्यक्ष बरदान पुरवठा केला जात आहे. त्यामुळे भरड धान्य खरेदीसाठी लागणाऱ्या बारदानाचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात मकासह भरड धान्य खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध नसल्याने भरड धान्य खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात भरड धान्य शिल्लक राहिले आहे. तसेच केंद्र शासनाच्या जुट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेण्यात येत असलेले बारदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध न होऊ शकल्याने अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून प्रथमतः रेशन दुकारांकडे उपलब्ध असलेले जुने बारदान घेतले जात होते. मात्र तेही संपल्याने भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असलेला १० लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेड मार्फत भरड धान्य खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.