दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद हा मानवतेचा शत्रु; – अमित शहा

नवी दिल्ली : बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 आज राज्यसभेतही संमत झाले. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून आपल्या भूमीवरुन दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असा संदेश जावा यासाठी सदनाने हे विधेयक एकमताने संमत करावे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केले.

दहशतवादाविरोधात कठोर कायद्यासाठी आम्ही सदैव पाठिंबा दिला आहे आणि या दिशेने कोणतीही सुधारणा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतातून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे आणि आम्ही नेहमीच याला पाठिंबा देऊ असे गृहमंत्री म्हणाले.

दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असे सांगून सर्व नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.

दहशतवादी कारवाया या संघटनांकडून नव्हे तर व्यक्तींकडून घडवल्या जातात. संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केल्यानंतर त्या संघटनेचे सदस्य नवी संघटना निर्माण करतात. दहशतवाद ही संपूर्ण जगासमोरची समस्या आहे असे सांगून जगातल्या अनेक देशांनी यासंदर्भात आपापले कायदे तयार केले आहेत. संयुक्त राष्ट्रांसह जगातल्या अनेक देशात व्यक्तीला दहशतवादी घोषित केले जाते असे त्यांनी सांगितले.

या कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. कायद्यात सुधारणा केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या महासंचालकांना अशी संपत्ती जप्त करण्याचा अधिकार दिला जात आहे. ज्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्यात येणाऱ्या चौकशी संदर्भात दहशतवादी संबंध आहे. राज्य पोलिसांचे अधिकार या कायद्यामुळे हिरावून घेतले जात नाहीत असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या कायद्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेला दहशतवादाशी संबंधित संपत्ती जप्त करण्यासाठी संबंधित राज्याच्या पोलिस महासंचालकांची परवानगी घ्यावी लागते. विभिन्न राज्यात अशी संपत्ती असली तर यांसदर्भातल्या प्रक्रियेला यामुळे उशीर होत असे असेही त्यांनी सांगितले.