नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा अधिक संसर्गजन्य असल्याचा ब्रिटन सरकारचा दावा दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री वेलींनी माखीजे यांनी काल फेटाळून लावला.

आमच्या देशात आढळेला विषाणूचा प्रकार हा ब्रिटनमध्ये आढळलेल्या प्रकारापेक्षा अथवा, कोरोना विषाणूच्या इतर कोणत्याही प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचा पुरावा नाही, असा दावा माखीजे यांनी केला.

दरम्यान, या विषाणूचे नवे प्रकार आढळल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर्मनी,स्वित्झर्लंड आणि जपान इथं ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहे.

डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम या देशांनीही त्यांच्याकडे असे रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे. जवळपास 50 देशांनी ब्रिटनवर तात्पुरते प्रवास निर्बंध जारी केले असून ब्रिटननंही दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे.