मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ६७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५६ हजार ५७५ झाली आहे.

काल ३६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ४५१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ५० शतांश टक्के झाला आहे.

काल दोन हजार ४२२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ७२ हजार ४७५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यभरात ३१ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, काल राज्यभरात ७९६ लसीकरण सत्रात ४० हजार लाभार्थ्यांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. राज्यात आतापर्यंत सहा लाख ४८ हजार ५७३ आरोग्य कर्मचारी तसंच आघाडीवर कोविड योद्ध्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

मराठवाड्यात काल हिंगोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २२० रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात ७१ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ४५, लातूर ३५, नांदेड २०, बीड १६, उस्मानाबाद १२, परभणी ११, तर हिंगोली जिल्ह्यात काल १० नवे रुग्ण आढळून आले.