भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी महसूल विलास ठाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळ सदृष्य परिस्थितीसंबंधी माहिती दिली. सन २०१८-१९ च्या खरीप हंगाम भंडारा जिल्ह्यात ट्रिगर-२ लागू झालेल्या मोहाडी, पवनी व लाखनी तालुक्यामध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहिर करुन विविध उपाय योजना व सवलती लागू करण्याबाबत मंजुरी देण्यात आली. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुक्याव्यतिरिक्त जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या इतर तालुक्यातील २५८ महसूल मंडळात शासनाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहिर केली आहे. यामध्ये तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी व पवनी तालुक्यातील आमगाव महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहिर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिली.

खरीप हंगाम २०१८ ची अंतिम पैसेवारी जाहिर करण्यात आली असून यात १२९ गावात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असून ७१६ गावे ५० पैसे पेक्षा जास्त पैसेवारी असलेली आहेत. काही तालुक्यात अतिरिक्त पीक कापणी प्रयोग घेवून शासनास प्रस्ताव पाठविल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यात लघु, मध्यम व मोठ्या ६३ प्रकल्पात ११ टक्के जीवंत पाणीसाठा असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. जिल्ह्यात चाराटंचाई नसून चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम सन २०१८-१९ मध्ये ६२ कामे प्रस्तावित आहेत तर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १२ नवीन योजना सुरु आहेत. जिल्ह्यात टँकरने पा पुरवठा येत नाही. पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ नरेगा अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामे सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १२८७ कामे सुरु असून यावर ६६ हजार १३९ मजुरांची उपस्थिती आहे. जलयुक्त शिवारची ५० टक्के कामे नरेगा अंतर्गत घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यात खरिपाची नियोजन करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटप सुरु असून ४३८ कोटीचे उद्दिष्ट जिल्ह्याला आहे. सध्या १२० कोटीचे वाटप करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिले. जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या अडचणी व समस्या मांडण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याबरोबरच मंत्रालयस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची माहिती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.