नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जपानमधल्या सुकुबा येथे जी-20 मंत्रीस्तरीय व्यापार परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. यजमान जपान तसेच अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्स, सिंगापूर, कोरिया, स्पेन, कॅनडा, युरोपीय संघटना, मॅक्सिको, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, चीली आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान गोयल यांनी भारतीय उत्पादनांसाठी परस्परांच्या बाजारपेठा उपलब्ध करुन देण्याच्या उपलब्धतेवर भर दिला.

जागतिक व्यापार आणि गुंतवणूक मंदावणे ही चिंतेची बाब असून यामुळे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होत आहे असे ते म्हणाले.

सर्वसमावेशक आणि विकासकेंद्री मुक्त व्यापार निर्मितीसाठी भारत कटिबद्ध असून शाश्वत विकास उदिृष्ट साध्य करणे आणि दारिद्रय निर्मूलन यावर देखील लक्ष केंद्रित करायला हवे असे वाणिज्य मंत्री म्हणाले.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे सेवा हा विकासाचा महत्वपूर्ण घटक बनल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सेवा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून त्याचा कुशल व्यावसायिकांनी लाभ उठवायला हवा असे ते म्हणाले. विकसनशील देशांमधल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाने प्राधान्याने बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची विनंती त्यांनी जी-20 देशांच्या प्रतिनिधींना केली. सूक्ष्म आणि लघु उद्योगांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते असे ते म्हणाले.

व्यापार आणि डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत वाणिज्यमंत्र्यांचे निवेदन पुढील लिंकवर उपलब्ध आहे.