नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काल प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत निश्चित झालं आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, ब्रिटन संसदेच्या ६५० जागांपैकी हुजूर पक्षाला ३६८ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर मजूर पक्षाला १९१ आणि लिबरल डेमोक्रेट्स पक्षाला १३ तर ब्रेक्झिट पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
या निकालांमुळे ब्रिटनचा युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी २८ देश सदस्य असलेल्या युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी हुजूर पक्षाला बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना केलं होतं. तर मजूर पक्षाचे प्रमुख जेरेमी कॉर्बीन यांनी ब्रेक्झिटवर नव्यानं सार्वमत घेण्याचं आणि सर्व सुविधांचं राष्ट्रीयकरण करण्याचं आवाहन केलं होतं.