नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया यांच्यात सहमती, भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे, दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्धार केला आहे आणि परस्पर हितांच्या क्षेत्रातल्या 12 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

त्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या करारावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाच्या वतीनं युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी काल रात्री रियाध इथं स्वाक्षऱ्या केल्या. ही परिषद म्हणजे दोन्ही देशांमधल्या संबंधाच्या सर्व पैलूंना सामावून घेणारी एक द्विपक्षीय यंत्रणा असेल. सौदी अरेबियाच्या एक दिवसाच्या भेटीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाच्या युवराजांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाल्यावर सामंजस्य करार करण्यात आले.

कट्टरवाद आणि दहशतवाद यांचा संबंध कोणताही विशिष्ट धर्म, संस्कृती आणि पंथाशी जोडू नये, याबाबत दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली. सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा दोन्ही देशांनी निषेध केला आणि इतर देशांविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांच्यासारख्या शस्त्रांच्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, क्षमतावृद्धी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कारवायांना रोखण्यासाठी परस्पर सहकार्यात वाढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्र्याच्या या दौऱ्याच्या शेवटी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबीत सर्व स्वरुपांचा हस्तक्षेप टाळण्याचा पुनरुच्चार दोन्ही देशांनी केला. तसंच देशांच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही प्रकारे घाला घातला जाणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं आपली जबाबदारी पूर्ण करावी अशी गरज दोन्ही देशांनी व्यक्त केली.

दोन्ही देशांमधल्या जलमार्गांची सुरक्षितता आणि संरक्षणाच्या उपाययोजनांना चालना देण्याबाबतही सहमती व्यक्त केली. संरक्षण, अपारंपरिक उर्जा, अंमली पदार्थांची तस्करी आणि वाहतुकीला प्रतिबंध आणि नागरी हवाई वाहतूक या क्षेत्रांचा सामंजस्य करारांमध्ये समावेश होता. सौदी अरेबियाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी झालेला संवाद अतिशय फलदायी होता असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी केलं. हा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले आहेत.