नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याची मुंबईत निवड करणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी केंद्रीय निरीक्षक असतील.
दरम्यान सत्तास्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेचे दावे प्रतिदावे सुरुच असून, निर्माण झालेला तिढा तातडीनं सुटण्याची चिन्हं नाहीत. सत्तेमध्ये समान भागीदारी म्हणून शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं आपण कधीही आश्वासन दिलं नव्हतं, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल सांगितलं.
भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकात पाटील या दोन ज्येष्ठ नेत्यांनीही फडनवीस यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेनंतर फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला अंतिम केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील विधिमंडळ गटनेता निवडीसाठी मुंबईत बैठक होणार आहे.