मुंबई :  स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून पद ग्रहण करणे हा माझाच सन्मान असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

राजभवन येथे मंगळवारी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे महाराष्ट्राचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदग्रहण केले. यावेळी राज्यपालांनी स्काऊट प्रतिज्ञा घेतली. स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी राज्यपालांना मानचिन्ह आणि स्कार्फ प्रदान केला.

या कार्यक्रमास अतिरिक्त सचिव संजय महाडिक यांच्यासह स्काऊट आणि गाईडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपण ६० वर्षापूर्वी शालेय जीवनात स्काऊट आणि गाईड मध्ये सहभाग घेतला होता; त्याकाळातील आठवणींना राज्यपालांनी यावेळी उजळा दिला. ते म्हणाले, देशात ४७ लाखांपैकी राज्यात १४ लाख स्काऊड आणि गाईडचे सदस्य आहेत ही अभिमानाची बाब असून, राज्यात स्काऊट आणि गाईडचे कार्य प्रगतीवर असल्याचे दिसते.  आजही स्काऊट आणि गाईडचे महत्त्व कमी झाले नाही. समाजसेवा ही ईश्वरसेवा असून, यामुळे आपल्यात शुद्ध भाव निर्माण होण्यास मदत होते. हे निस्वार्थ काम आपल्याला आत्मिक आनंद देत असते. स्काऊट आणि गाईडने कोरोना महामारीच्या काळात सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले, भविष्यातही आपले कार्य असेच सुरू राहील, असा आशावाद राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्य आयुक्त बकोरीया यांनी सांगितले की, टाळेबंदीच्या काळात स्काऊट गाईडतर्फे स्वत: मास्क तयार करून वितरित करण्यात आले आहेत. अन्न धान्य वाटपाचे कार्यक्रमही देशभर आयोजित करण्यात आले होते. याचबरोबर ऑनलाईन कार्यक्रमातही स्काऊट गाईडने सहभाग नोंदविला असून, भविष्यातही समाजाप्रती कार्य असेच सुरू राहील.