मुंबई : नागरिकांना शुद्ध, पोषक आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतील यासाठी ‘आहार’ रेस्टॉरंट संघटनेने पुढाकार घ्यावा. राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून लोकांना दर्जेदार आणि पोषक अन्न मिळण्यासाठी आहार संघटना आणि अन्न-औषध प्रशासन विभागाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

मंत्री श्री. रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात आहार रेस्टॉरंट संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, आहार संघटनेचे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी, सल्लागार अरविंद शेट्टी, सुरेश शेट्टी, शिवानंद शेट्टी,भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या उपसमितीचे अध्यक्ष शशिकांत शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, शहरातील एकाही रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांमध्ये कीटक किंवा इतर कोणतीही घाण सापडणे योग्य नाही. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम तर होतोच, पण त्याचबरोबर शहराच्या खाद्यसंस्कृतीविषयक प्रतिमेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे हे थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि आहार संघटनेने एकत्रित काम करावे. जंक फूड टाळून पोषण आहार घेण्याविषयी शासनाचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग मोठी जनजागृती करत आहे. यातही आहार संघटनेने सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता, रेस्टॉरंट आणि परिसराची स्वच्छता, वेटर, स्वयंपाकी आदी कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची स्वच्छताविषयक काळजी आदींबाबत रेस्टॉरंट्स, छोटे हॉटेल व्यावसायिक यांच्यासह रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते यांचेही प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला असून अशा प्रशिक्षणांची संख्या वाढविण्यात यावी,अशी मागणी यावेळी आहारच्या प्रतिनिधींनी केली. या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.

अन्नाची गुणवत्ता, रेस्टॉरंट आणि किचनची स्वच्छता, मिळणारी सेवा आदी विविध निकषांच्या आधारे रेस्टॉरंट्सचे मानांकन (ग्रेडींग) होणे गरजेचे आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सूचित केले.

आहार संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी मंत्री श्री. रावल यांना निवेदन सादर केले. लोकांना शुद्ध अन्न मिळेल याअनुषंगाने संघटनेच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.