डॉ. निलम गोऱ्हे, आढळराव पाटील यांचा सत्कार
पिंपरी : सर्वसामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी चळवळीतून शिवसेना उभारली आहे. त्याच शिवसेनेचे कार्य केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील नागरीकांना जिव्हाळ्याचे, आपुलकीचे वाटू लागले आहे. कारण, आपण ज्या शहरात, गावात राहतो, त्याचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने, शिवसैनिक कार्य करत असतो. शिवसैनिकांनीही जनतेचा आधारवड झाले पाहीजे, असे आवाहन शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी केले.
शिवसेना उपनेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना भोसरी विधानसभेतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात मिर्लेकर बोलत होते. हॉटेल न्यू बर्ड व्हॅलीच्या सभागृहात पार पडलेल्या या शिबीरामध्ये शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेते राहुल कलाटे, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेविका मीनल यादव, अमित गावडे, जितेंद्र ननावरे, आदी उपस्थित होते.
रविंद्र मिर्लेकर म्हणाले, शिवसैनिक हा एखाद्या जळत्या निखाऱ्यासारखा असला पाहीजे. कुणी हात लावला, तर त्याचा हात भाजला पाहीजे. शिवसेनेतर्फे मिळालेले प्रत्येक पद हे संघटनेचे पद असते. त्यातूनच माणसे जोडता आली पाहीजेत. पद मिळाल्यानंतर त्याची जबाबदारी ओळखा, त्या दृष्टीने काम करा. मग विजय दूर नाही आणि आपण कुठलीही निवडणूक हरू शकत नाही. त्यासाठी वेड लागल्यासारखे काम करा. कारण, वेडी माणसेच इतिहास घडवू शकतात. येत्या काळात येणाऱ्या शिवशाहीसाठी, शिवसेनेसाठी झोकुन देवून काम करा.
संघटीत व्हा, निष्ठा पणाला लावा, येत्या विधानसभेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. डॉ. निलम गोऱ्हे म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीचे वैभव आहे, असेही उद्गारही त्यांनी काढले. बाळा कदम म्हणाले, संघर्ष शिवसैनिकाच्या रक्तातच आहे आणि त्याच्यावरच ही लढवय्यी शिवसेना उभी आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये संपूर्ण ताकदीने आणि गटबाजी विसरून उतरूया, असे आवाहन केले. उमेदवारी कुणालाही द्या. पण,चिन्ह धनुष्यबाण आणि उमेदवार शिवसेनेचाच असावा, अशी अपेक्षा सुलभा उबाळे आणि इरफान सय्यद यांनी व्यक्त केली. धनंजय आल्हाट यांनी प्रास्ताविक केले.
काहीही घ्या, पण मन अन् मत मिळणार नाही ! – डॉ. निलम गोऱ्हे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पाखाखालची वाळू आता पूर्णपणे सरकली आहे. त्यामुळे ते काहीही बरळायला लागले आहेत. ’उडाले ते कावळे अन् राहीले ते मावळे’, हे आपल्याचा साहेबांचं वाक्य आता त्यांच्या तोंडी यायला लागले आहे. इतकेच नव्हे, तर आमचा भगवा रंग सुद्धा म्हणे, त्यांच्या झेंड्यावर दिसणार आहे. आमची वाक्ये घ्या, झेंड्यांचा रंग घ्या, काहीही घ्या, पण आमचं मन आणि मत काही तुम्हाला मिळणार नाही, असा टोला डॉ. निलम गोऱ्हे यांनी लगावला. शिवसेनेमुळे हे विधानपरिषदेचे उपसभापतीपद मला मिळाले आहे, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक उपसभापती आहे, अशी कृतज्ञ भावना देखील त्यांनी व्यक्त केली.