नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर इथं ९ वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन केलं. या महाविद्यालयामुळे पूर्वांचल क्षेत्रात वैद्यकीय सुविधांचा विकास होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या महाविद्यालयामुळे ५ हजार डॉक्टर आणि इतर तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध होईल, तर उपचारासाठी २५ हजार नव्या खाटा उपलब्ध होतील असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यात पूर्वांचल आरोग्य सुविधा पूरवणारे केंद्र म्हणून विकसित होईल असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते. जागतिक स्तरावरच्या सर्वोत्तम आरोग्य सुविधा जनतेला पुरवणं हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश असून त्यासाठी वैद्यकीय शिक्षणाला चालना दिली जात असल्याचं मांडविया यांनी यावेळी सांगितलं.