पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसने रोज लाखो नागरिक प्रवास करतात. बसमध्ये जाहिरात लावल्याने अधिक फायदा होण्याच्या उद्देशाने अनेक व्यक्ती, कंपन्या सर्रास बसेसमध्ये आपल्या जाहिराती लावतात. स्पर्धा परीक्षा, धार्मिक चमत्कार, जादूटोणा आदींबाबत पीएमपीएलच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा जाहिरात लावण्यात आल्या आहेत.

यामुळे बसेसचे विद्रूपीकरण होत आहे. त्याचबरोबर पीएमपी प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मनमानी करत या जाहिराती बसेसच्या खिडक्‍या, सीट्‌स आणि दरवाज्यांवर लावल्या जातात. यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान तर होतेच; पण मालमत्तेचे नुकसान होते. यामुळे पीएमपीने यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या जाहिरातींमुळे पीएमपीएल प्रशासनालाही नाहक त्रास सहन करावा लागत असून बसेस स्वच्छ करतावेळी अधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, यापूर्वी पोलिसांच्या मदतीने अशा जाहिरातींवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी सांगितले.