नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियामध्ये वर्तमान अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्या सत्तारुढ युनायटेड रशिया पार्टीला तीन दिवसांच्या निवडणुकीनंतर संसदेत पुन्हा बहुमत मिळालं आहे. परंतु निकालांनुसार पक्षानं आपल्या समर्थक मतांपैकी सुमारे एक पंचमांश मतं गमावली आहेत. ताज्या वृत्तांनुसार, ३३ टक्क्यांहून अधिक मतांची आतापर्यंत मोजणी झाली असून पुतिन यांच्या पक्षानं ४५ टक्क्यांहून अधिक तर त्यांच्या नजिकच्या प्रतिस्पर्धी कम्युनिस्ट पार्टीला सुमारे २२ टक्के मतं मिळाली आहेत. साहजिकच युनायटेड रशिया पार्टीचा हा विजय असल्याचं सूचित होत असलं तरी २०१६ च्या संसदीय निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची ही कामगिरी तोकडीच असल्याचं दिसून येतं. २०१६ च्या निवडणुकीत या पक्षाला ५४ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती.