पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार आले आहेत.
आयोगाने फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा घेतली होती. निकालासह कटऑफ गुणांची यादीही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यात खुल्या गटात सर्वसाधारण जागांसाठी १९८, महिलांसाठी १८०, खेळाडूंसाठी १४३ आणि अनाथांसाठी १४० कटऑफ आहे.
एसईबीसी आणि ओबीसी गटात सर्वसाधारण जागांसाठी १९७, महिलांसाठी १८०, खेळाडूंसाठी १४३ कटऑफ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवड झालेल्यांत पुणे (२ हजार ४९५), मुंबई (४१८), नगर (३९९), औरंगाबाद (३१२), जळगाव (१२२), कोल्हापूर (३८५), लातूर (१५९), नागपूर (१९९), नांदेड (१५१), नाशिक (३५२), नवी मुंबई (१८२) आदी जिल्ह्य़ातील उमेदवार आहेत. मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै दरम्यान होईल.
गट अ आणि ब पदांसाठी निश्चित केलेली क्रीडाविषयक अर्हता धारण करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीची क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालकांकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करणे, त्याची पोचपावती, मुलाखतीवेळी प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.