संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

पिंपरी : “रेनिसान्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” या वादग्रस्त पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा बदनामीकारक मजकूर वगळण्यात यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “रेनेसान्स स्टेट द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” या पुस्तकात लेखक गिरीष कुबेर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी अनैतिहासिक आक्षेपार्ह बदनामीकारक लिखाण केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मातोश्रीची हत्या केली असे, लिखाण कुबेर यांनी केले आहे. ‘रेनेसान्स स्टेट’ या पुस्तकाचे प्रकाशन साधारणतः दहा महिन्यांपूर्वी झाले होते. तेव्हा पासूनच या वादग्रस्त पुस्तकाविरोधात विविध सामाजिक संघटनांनी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, अनेक ठिकाणी शिवप्रेमींनी उपोषण, धरणे आंदोलन, रस्ता रोको आंदोलन यासारखे शेकडो आंदोलने करून गिरीश कुबेर यांचेवर गुन्हा दाखल करून, त्याच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलने केली आहेत. 

कुबेर यांच्या पुस्तकासंदर्भात महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. पाच डिसेंबर रोजी नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणीं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लेखक गिरीश कुबेर यांचे तोंड काळं करुन निषेध नोंदवला होता. तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे पाठपुरावा केलेला आहे. तरी देखील अद्यापपर्यंत वादग्रस्त पुस्तका संदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

तरी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमीच्या वतीने शासनास विनंती करण्यात येते की, येत्या पंधरा दिवसांत ‘रेनेसान्स स्टेट’ या पुस्तकातून संभाजी महाराजांबद्दलचा बदनामीकारक मजकूर वगळावा.

सदर निवेदनाची राज्य शासनाने तात्काळ दखल घेऊन उचित कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी राज्य शासनाची असेल, असा इशारा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर उपाध्यक्ष संजय जाधव यांच्या सह्या आहेत.