शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा एका संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. मात्र या पत्रकात फक्त शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची युती झाल्याचा उल्लेख होता. यामुळे युतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं. आज अखेर शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला सर्वांसमोर आला आहे. महाराष्ट्रात असलेल्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १२४ मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे तर उर्वरित १६४ मतदारसंघ भाजपला मिळाले आहेत. मित्रपक्षांना देण्यात येणाऱ्या जागा केवळ भाजपच्याच कोट्यातून देण्यात येतील. हा आकडा १८ इतका असण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांच्या १८ जागा सोडून भाजपच्या हातात केवळ १४६ जागा उरतात. महाराष्ट्रात बहुमत मिळवायचं असेल तर भाजपला १४६ पैकी १४४ आमदार निवडून आणावे लागतील. जे शक्य होणार नाही. मित्रपक्षांना कमळ चिन्हावर लढवल्यास भाजपला १६४ पैकी १४४ जागा आणाव्या लागतील. हेसुद्धा सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार अशक्य आहे. यामुळे यंदाही भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्यावरच सत्ता मिळणार असल्याचं चित्र आहे. शतप्रतिशत भाजप या घोषणेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीआधीच सुरुंग लावल्याची चर्चा यानिमित्ताने राजकीय क्षेत्रात रंगू लागली आहे.
शिवसेना-भाजपने मागील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. यावेळी भाजपला १२२ जागांवर अभूतपूर्व विजय मिळाला होता. तर शिवसेनेनेही एकाकी झुंज देत ६३ जागांवर विजय मिळवत भाजपला बहुमत मिळवण्यापासून रोखलं होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा युतीची घोषणा झाली. लोकसभेत बहुमत मिळाल्यास भाजप पुन्हा विधानसभेत दगाबाजी करू शकते हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीतही युती झाल्याची घोषणा भाजपला करायला भाग पाडलं. लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला ३०३ जागांवर विजय मिळाला. तरीही उद्धव ठाकरेंच्या डावपेचांमुळे भाजपचा वारू महाराष्ट्रात चौफेर उधळू शकला नाही. मागील विधानसभा निवडणुकीवेळी स्वबळावर लढणाऱ्या भाजपला यावेळी ते धाडस दाखवणं जमलं नाही. शिवसेना-भाजपच्या नवीन जागावाटपात शिवसेना छोटा भाऊ झाल्याचं वरवर दिसत असलं तरी खोलात जाऊन विचार केल्यास हा शिवसेनेचा सर्वात मोठा विजय आहे हे लक्षात येईल. यामुळे जागावाटपाच्या बुद्धिबळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न बोलताच भाजपचा गेम केला असं म्हणायला हरकत नाही.
लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपला ३०३ खासदारांसह पाशवी बहुमत मिळूनही महाराष्ट्रात मात्र भाजपला युतीतच लढणं भाग पडलं. मागच्यावेळी २८२ खासदार असताना भाजपने युती तोडली होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.
शिवसेनेचे ६३ आमदार असताना शिवसेनेने १४४ चा आग्रह धरून १२४ जागा मिळवल्या. म्हणजे शिवसेनेला अजून ६१ आमदार वाढवण्याची संधी आहे. यापैकी ३० जागा तरी शिवसेना नक्की मिळवेल. भाजपला १२२ आमदार असूनही फक्त २४ जागा जास्त मिळाल्या. म्हणजे सर्वच्या सर्व जागा जाणल्या तरी भाजपला केवळ २४ जागाच वाढवता येतील.
१४६ जागा लढून भाजपला १४४ जागा मिळणं केवळ अशक्य आहे. मित्रपक्षांच्या जागा धरून १६४ जागा कमळ चिन्हावर लढवल्या तरी १४४ आमदार निवडून येणं अवघडच आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपला शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही.
वर मांडलेले मुद्दे हा केवळ ट्रेलर होता. मुख्य मुद्दा अजून बाकी आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या १६४ जागांपैकी पैकी भाजप फारतर १३० जागा जिंकू शकेल. म्हणजे २०१४ च्या तुलनेत केवळ ८ जागा जास्त. दुसरीकडे शिवसेनेला १२४ पैकी ९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे २०१४ च्या तुलनेत २७ जागा जास्त.
६३ आमदार असलेली शिवसेना ५ वर्षे महाराष्ट्रात प्रचंड प्रभावी ठरली. सत्तेत राहून जनतेच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत शिवसेनेने जनतेला न्याय मिळवून दिला. शिवसेनेला असं करण्यापासून भाजप रोखू शकला नाही आणि सत्तेबाहेरही ठेऊ शकला नाही.