सध्या सोशल मीडियावर पडीक असणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्या व्यवसाय, करिअर याला अनुसरून आवश्यकतेनुसार सोशल अँक्टिव्ह राहणाऱ्यांनाही आता या उपद्रवी घटकांचा फटका बसू लागला आहे. आपला संबंध, लायकी असो किंवा नसो, पण पोस्टी केल्याच पाहिजेत, कमेंटी टाकल्याच पाहिजेत, असा अनेकांचा हट्ट असतो. दिसली अपडेट की, कर कमेंट, कर ट्रोल, तुझी भाषा अधिक असभ्य की माझी, यातही जणू स्पर्धाच लागलेली असते. त्यातही महिला सेलिब्रेटी, महिला राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ती वा अगदी जरा बरी दिसणारी कॉमन वूमन असेल, तर अशा विकृतींना अधिकच चेव येतो. सध्या सोशल मीडियावर एक चक्कर मारली, तर ‘ट्रोल’धाडीने हैराण झालेल्यांचा एक समूहच भेटेल. अनेकांनी या विकृतीला वैतागून आपले सोशल अकाऊंट बंद केले आहे. केतकी चितळे, सानिया मिर्झा, ऊमिर्ला मातोंडकर अशी खूप उदाहरणे देता येतील. ट्रोलिंगला वैतागून नैराश्येच्या गर्तेत गेलेल्या एका सेलिब्रेटी युवतीने २३ व्या वर्षीच आत्महत्या केल्याची घटनाही समाजाने अनुभवली आहे.

याआधी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. केतकी चितळेच्या वाट़याला आलेल्या कमेंट्स तर हादरवून टाकणाऱ्या आहेत. इतका व्देष खरेच असतो का, की उगाच काहीतरी थ्रील मिळते म्हणून या कमेंट्स टाईमपास म्हणून केल्या जातात. बरे इतका व्देष राग व्यक्त करायचाच आहे, तर मग तो आपल्या खऱ्या नावाने का होत नाही? एखादीला बदनामी करण्यासाठी विकृतांना बनावट, फेक नावांची मदत का घ्यावीशी वाटते? जे केतकी चितळेच्या बाबतीत झाले, तेच अनेकींच्या बाबतीत घडले आहे. मात्र, केवळ बनावट वापरकर्ते असल्याने संबधितांपर्यंत पोहोचण्यातील असमर्थतता समोर येते. कारवाई कोणावरच होत नाही. समाजमाध्यम हे सर्वसामान्य नागरिकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचे हक्काचे माध्यम झाले आहे, मात्र या माध्यमात व्यक्त होताना कुणीच काही काळजी घेताना दिसत नाही. प्रेक्षकांसमोर जाताना, एखाद्यावर टीकाटिप्पणी करताना काही तत्त्वे, संकेत पाळायचे असतात, हेच अनेकांच्या ग्वाही नसते. काळ बदलतो तशी संवादाची माध्यमे बदलतात. एखाद्याकडून काही चूक अथवा वावगे घडल्यास, घरातल्या मोठ़या मंडळींसमोर त्याचा जाब देण्याची पद्धत पूर्वी होती. व्यक्तिस्वातंत्र्य जपण्याच्या आजच्या काळात हे काहीसे मागे पडले असले, तरी समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर मात्र तत्काळ प्रतिक्रिया उमटून चांगल्या आणि वाईटाचा निर्णय उमटल्याचे दिसते.

या माध्यमात एखाद्या घटनेवर दिलेल्या प्रतिक्रियांचे परिणाम त्या संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर, व्यवसायावर निश्चितपणे होतात. म्हणून या माध्यमाचा वापर प्रत्येकाने काळजीपूर्वकच करायला हवा. खेळ, चित्रपट, राजकारण, समाजकार्य किंवा आणखी काही. हल्ली प्रत्येक गोष्ट सामाजिक झाली आहे. आपापल्या विचारांचा समूह जमवून संवाद साधणे आता सोपे झाले आहे. थेट चाहत्यांशी संपर्क होत असल्याने कलाकारांनाही हा संवाद आवडू लागला आहे. आपल्या कामाबद्दल चाहत्यांना काय वाटते, हे जाणून घेणे त्यांना सोपे झाले आहे. मात्र, चाहते उत्साहाच्या, उद्रेकाच्या भरात प्रतिक्रिया देताना पातळी सोडतात आणि वाटेल त्या शब्दांत प्रतिक्रिया देतात तेव्हा होणारा अपमान, बदनामी भयानक असते. हे एकप्रकारचे सोशल मॉब लिंचिंग ठरते आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्रोल्सनी लक्ष्य केले होते, त्यावर स्वराज यांनी नम्रपणे म्हटले होते की, लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात. कृपया, टीका करा, पण चुकीच्या भाषेत नको. सभ्य भाषेतील टीका अधिक प्रभावी असते. धर्मव्देष पसरवणाऱ्या आणि जातीयतेचे रंग देणाऱ्या ट्रोलर्सना तर सोशल मीडियावर बंदी घालायला हवी. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या चुकीच्या गोष्टीवर भाष्य करताना, सोशल नेटवकिंर्गवर सुरू असलेले ट्रोलिंग हे प्रतिष्ठेच्या विरोधात असून, ट्रोलिंगसारख्या आक्रमक गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाही, असे म्हटले आहे.