सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या.

कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आज महामार्गाच्या कामविषयी झालेल्या आढावा बैठकीवेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीला आमदार वैभव नाईक, संदेश बारकर, श्री. रावराणे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, कुडाळचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, कणकवलीचे प्रांताधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणचे अधिकारी, सार्व. बांधकाम, महामार्ग वाहतूक, विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे अधिकाऱ्यांना खडसावून पालकमंत्री म्हणाले की, अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती दक्षता घेतलेली नाही. भराव खचलेले आहेत. माती रस्त्यावर येत आहे. कणकवली शहरामध्ये उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व समस्यांवर येत्या १५ दिवसात उपाययोजना करुन महामार्ग सुरक्षित करावा. महामार्गाच्या कामामुळे बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे ती मंगळवारपर्यंत सुरू करावी. लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे. ज्याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती सोय नाही त्या ठिकाणी चर काढूण पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, असे पहावे. महामार्गावर दुचाकी वाहन धारकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सुरक्षिततेस महत्व द्यावे. ज्याठिकाणी जोड रस्ता व पूल यांच्यामध्ये खड्डे पडले आहेत, खचले आहेत अशा ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खचलेल्या ठिकाणी ते भरुन घेण्यात यावेत. ही सर्व कामे येत्या १५ दिवसांमध्ये युद्धपातळीवर पूर्ण करावीत. प्रवाशांची सुरक्षितता हा महत्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांनी महामार्गाची पहाणी करावी

जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, महामार्ग पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाची संपूर्ण पहाणी करुन सर्व समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या. संपादीत जागेमध्ये झालेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रांताधिकारी व कणकवली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी तातडीने करावी. सर्व्हिस रोडवर झालेले अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा जेणेकरून महामार्गाचे काम सुरुळीत सुरू राहील, आशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कणकवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सेवा केंद्र

महामार्गाच्या कामामुळे उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडवता याव्यात यासाठी कणकवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सेवा केंद्र उभारण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी या बैठकीमध्ये दिल्या. तसेच महामार्ग ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे काही अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिल्या. तसेच याविषयीची एक नोटीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी महामार्ग प्राधिकरणला पाठवावी, कोणत्याही परिस्थितीत महामार्ग हा सुरक्षित झाला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गणेश चतुर्थीत येणाऱ्या चाकरमान्यांची सुरक्षितता महत्वाची

गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येतात असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, दरवर्षी गणपती जवळ आल्यानंतर रस्त्याची पाहणी व दुरुस्तीविषयी काम सुरू होते. पण हे काम आताच हाती घेणे योग्य आहे. त्यामुळे गणपतीपर्यंत रस्ता सुरक्षित व चांगला करता येईल. त्या दृष्टीनेच सध्या महामार्गाची पाहणी व त्याविषयीची बैठक घेऊन सूचना दिल्या असल्याचे त्यांना यावेळी सांगितले. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात यावी. महामार्ग पोलीस तसेच विभागीय परिवहनच्या अधिकारी व कर्मचारी यांची महामार्गावर धोकादायक ठिकाणी नेमणूक करावी. त्यांनी महामार्गावर वाहन धारक योग्यरित्या वाहन चालवतील याविषयी जागरुक रहावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कणकवली येथे महामार्गाची पाहणी

बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी यांच्यासह महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कणकवली सर्व्हिस रोड खचल्याने रस्ता वाहतूकीस धोकादायक बनल्याची पाहणीही त्यांनी केली. जानवली पुलाजवळ खचलेल्या मोरीच्या कामाचीही पाहणी त्यांनी केली.