नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं आपल्या चार दशकांपासून कायम राखलेल्या भूमिकेत बदल करत पॅलेस्टिनी प्रदेशातल्या वेस्ट बँक या भागात वसाहती उभारण्याच्या इस्राएलच्या अधिकाराचं समर्थन केलं आहे. पॅलेस्टिनी प्रदेशात इस्राएलच्या वसाहती अवैध आणि आंतरराष्ट्रीय कायद्याशी विसंगत असल्याचं अमेरिकेला वाटत नाही, अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉंपिओ यांनी केली आहे.

नागरी वसाहती स्थापन करण्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन ठरवण्यामुळे कोणतंही उद्दिष्ट साध्य झालेलं नाही किंवा शांतता प्रस्थापित झाली नाही, असं ते म्हणाले. अमेरिकेच्या बदललेल्या धोरणाचं इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वागत केलं आहे. या भूमिकेमुळे इतिहासातल्या चुकीची दुरुस्ती झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.