नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्मारक प्रधिकरणानं संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित दोन ठिकाणं राष्ट्रीय महत्वाची स्मारकं म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेल्या सातारा जिल्ह्यातल्या प्रतापराव भोसले हायस्कूलला राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकाचा दर्जा देण्यात येणार आहे.
या शाळेच्या रजिस्टर मध्ये आजही डॉ. आंबेडकर यांनी केलेली मराठी स्वाक्षरी जपून ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बडोदा इथल्या संकल्प भूमी इथल्या वटवृक्षालाही हा दर्जा दिला जाणार आहे. या ठिकाणी २३ सप्टेंबर १९१७ रोजी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा संकल्प करत सामाजिक क्रांतीची सुरुवात केली होती.