नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा, असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला आहे. राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त नवी दिल्लीत, प्रसारण भवनात आयोजित कार्यक्रमात काल बोलताना, ठाकूर यांनी, आकाशवाणी आणि दूरदर्शन, श्रोत्यांना विश्वासार्ह बातम्या पुरवत असल्याचं सांगून या माध्यमांची प्रशंसा केली. रॉयटर्स संस्थेच्या अहवालाचा हवाला देऊन ते म्हणाले की आकाशवाणी, ही देशातील सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम संस्था ठरली आहे. रेडियोची व्याप्ती वाढविण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की कम्युनिटी रेडियो स्थानकांची संख्या, पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत 360 ते 750 पर्यंत वाढविण्यावर भर दिला पाहिजे. आकाशवाणीनं आपल्य समृद्ध संग्रहाचा व्यवहार्य उपयोग करुन, दर्जेदार कार्यक्रम निर्मिती करावी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचावं असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीत आकाशवाणीनं निभावलेल्या लक्षणीय भूमिकेला ठाकूर यांनी उजाळा दिला.