नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाववाढ, वस्तू आणि सेवा कर तसंच अग्निपथ योजनेविषयी सरकारकडून निवेदनाची मागणी करणारे विरोधक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अनुचित शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसकडून माफीची मागणी करणारे सत्ताधारी पक्षाचे सदस्य यांच्या गदारोळामुळे आज नवव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर परिणाम झाला.
काँग्रेसचे अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल अनुचित शब्द वापरल्याबद्दल निषेध करणाऱ्या घोषणा लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी दिल्या. तर विरोधक आपल्या मुद्द्यांवर निवेदनाची मागणी करत गदारोळ करत होते. तेव्हा कामकाज दुपारी बारापर्यंत स्थगित करण्यात आलं. नंतरही गोंधळ चालूच राहिला आणि कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं. राज्यसभेतही दोन्ही बाजूंच्या सदस्यांची घोषणाबाजी चालू राहिल्यानं कामकाज आधी दुपारी बारापर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं.