नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी भारतानं बॅडमिंटनमध्ये दोन पदकं जिंकली.
भारताचा बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यानं पुरुष एकेरीच्या एस.एच सिक्स (SH6) या वर्गवारीत सुवर्णपदक जिंकलं. कृष्णा यानं हाँगकाँगच्या चू मान की याचा तीन सेटमध्ये पराभव केला. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या एका वर्गवारीत सुहास यथीराज यानं रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत त्याचा फ्रान्सच्या लुकास माझूर यानं पराभव केला.
यासोबतच भारतानं या स्पर्धेत ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १९ पदकं जिंकत, पदक तालिकेत २४वं स्थान मिळवलं. या स्पर्धेतली भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
कृष्णाच्या कामगिरीनं असंख्य भारतीयांना प्रेरित केलं आहे, तर सनदी अधिकारी म्हणून काम करत असतानाही सुहासनं खेळाप्रती दाखवलेली समर्पणवृत्ती अपवादात्मक आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
सुहानं बॅडमिंटन कोर्टात तसंच सनदी अधिकारी म्हणून केलेल्या कामगिरीमुळे अनेकांना प्रेरित केलं आहे, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
कृष्णाच्या दमदार विजेत्या कामगिरीनं भारताच्या असंख्य नागरिकांना आनंद दिला आहे, तर सुहास यथीराज याचं यश, म्हणजे नोकरीतली सेवा आणि खेळाप्रती निष्ठेचा विलक्षण मिलाफ आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
टोकिया पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा आज संध्याकाळी होईल. या स्पर्धेत दोन पदकं जिकणारी नेमबाज अवनी लेखरा समारोप सोहळ्यात भारताची ध्वजवाहक असणार आहे.