मुंबई (वृत्तसंस्था) :कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल १२ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्रानं नवा विक्रम नोंदवला आहे. काल १२ लाख ६ हजार ३२७ जणांना लस दिल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. लसीकरण कार्यक्रमातला हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतल्या सर्व घटकांच्या परिश्रमाचं हे फलित आहे, असं सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या एकूण ६ कोटी १५ लाखापेक्षा जास्त मात्र देण्यात आल्या आहेत. त्यात दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या एकत्रित अहवालानुसार राज्यात आतापर्यंत १ कोटी ७१ लाख जणांना दोन्ही मात्रा दिल्या आहेत.