नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे राज्य सभेतले खासदार संजय राऊत यांना काल मध्यरात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत अटक केली. न्यायालयानं त्यांना गुरूवारपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काल दिवसभर राऊत यांच्या निवासस्थानी झडती घेतली तसंच पत्रा चाळ जमिनीच्या कथित घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांची काल सहा तासापेक्षा जास्त वेळ चौकशी केली. राऊत यांना आज न्यायालयात हजर केलं. त्यापूर्वी सकाळी त्यांना सर जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं.
शिवसेना नेते आणि पक्षाचे प्रवक्ता संजय राऊत यांची भीती वाटत असल्यामुळे भाजपानं त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई केल्याचा आरोप राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी केला आहे. तसंच राऊत यांच्या अटके बाबत कुठलीही कागदपत्र ईडी कडून आपल्याला मिळाली नसून त्यांना या प्रकरणी फसवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राऊत यांना ईडीनं दोनदा समन्स बजावून देखील त्यांनी चौकशीसाठी हजर व्हायला नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर ईडीनं काल दिवसभर मुंबईत भांडुप इथल्या राऊत यांच्या निवासस्थानी झडती घेतली.