प्रश्न :राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू आहेत का ?
होय- भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971.
प्रश्न :राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी कोणते घटक वापरता येतात?
भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये तारीख 30 डिसेंबर 2021 घ्या आदेशानुसार काही बदल करण्यात आले आणि पॉलिएस्टर कापडाचा राष्ट्रध्वज किंवा यंत्राद्वारे बनविलेला ध्वज संमत करण्यात आला. आता हाताने कातलेला आणि हाताने विणलेला किंवा यंत्राद्वारे बनविलेला सुती, पॉलिएस्टर,लोकरी,रेशमी, खादी कापडाचा ध्वज बनविता येईल.
प्रश्न :राष्ट्रध्वजाचा सुयोग्य आकार आणि प्रमाण काय असावे?
भारतीय ध्वज संहितेच्या परिच्छेद 1.3 आणि 1.4 अनुसार, राष्ट्रध्वज आयताकृती असावा. ध्वजाचा आकार कितीही असला तरी त्याच्या लांबी आणि उंचीचे ( रुंदीचे ) गुणोत्तर 3 : 2 असावे.
प्रश्न :राष्ट्रध्वज खुल्या जागेत किंवा घरी फडकविण्यासाठी कोणती वेळ असावी ?
भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये तारीख 20जुलै 2022 च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे आणि भारतीय ध्वज संहितेच्या भाग II मधील परिच्छेद 2.2च्या कलम (xi ) जागी खालीलप्रमाणे सुधारित कलम घालण्यात आले आहे : (xi) जेथे ध्वज खुल्या जागेत किंवा जनतेच्या सदस्याच्या घरावर प्रदर्शित झाला असेल तर तो दिवसरात्र फडकत ठेवता येईल.
प्रश्न : राष्ट्रध्वज स्वतःच्या घरावर प्रदर्शित करताना मी कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत?
जेव्हा केव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित झाला असेल तर त्याची जागा सन्मानाची असावी आणि तो सुस्पष्ट जागी असावा. खराब किंवा अव्यवस्थित राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन केले जाऊ नये.
प्रश्न : राष्ट्रध्वजाचे अयोग्य प्रदर्शन टाळण्यासाठी मी कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात ?
1 राष्ट्रध्वज उलट्या रीतीने प्रदर्शित होऊ नये म्हणजेच केशरी पट्टा तळाचा पट्टा होऊ नये.
2 खराब किंवा अव्यवस्थित राष्ट्रध्वज प्रदर्शित करू नये.
3 राष्ट्रध्वज कोणा व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या सन्मानार्थ खाली केला जाऊ नये.
4 इतर कोणताही झेंडा किंवा निशाण राष्ट्रध्वजाच्या बाजूला किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याहून अधिक उंचीवर असता कामा नये, तसेच राष्ट्रध्वज उभारलेल्या ध्वजस्तंभावर कोणतीही वस्तू, उदा. फुले किंवा हार किंवा प्रतिक , लावू नये.
5 राष्ट्रध्वजाचा वापर पताका, रोझेट, निशाण किंवा इतर कोणत्याही प्रकारची सजावट म्हणून करू नये.
6 राष्ट्रध्वज जमिनीला किंवा पृष्ठभागाला टेकू देऊ नये किंवा पाण्यात थोडाही बुडू देऊ नये.
7 राष्ट्रध्वज खराब होईल अशा कोणत्याही पद्धतीने प्रदर्शित करू नये किंवा बांधू नये.
8 राष्ट्रध्वज एकाच वेळी इतर झेंडा किंवा झेंडे असलेल्या ध्वजशीर्षावरून ( ध्वजस्तंभाचा वरचा भाग) फडकावू नये.
9 एखाद्या वक्त्याचा मंच झाकण्यासाठी किंवा एखाद्या वक्त्याचे व्यासपीठ सजविण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला जाऊ नये.
10 राष्ट्रध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारचा पेहराव, गणवेश किंवा कमरेखाली नेसलेले कोणतेही गौण वस्त्र म्हणून होऊ नये. तसेच उशी, हातरुमाल, नॅपकिन, अंतर्वस्त्रे किंवा कोणत्याही पोशाखावर ध्वजाचे भरतकाम किंवा मुद्रण केले जाऊ नये.
प्रश्न : भारतीय राष्ट्ध्वजाचा अवमान टाळण्यासाठी काही नियम आहेत का ?
होय. राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971 च्या विभाग 2 विस्तार 4 च्या अन्वये, खाली दिल्याप्रमाणे वागणूक असावी:
1 राष्ट्रध्वज कोणत्याही प्रकारचा पडदा म्हणून वापरला जाऊ नये, उदा. खासगी अंत्यविधी प्रसंगी.
2 राष्ट्रध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारचा पेहराव, गणवेश किंवा कमरेखाली नेसलेले कोणतेही गौण वस्त्र म्हणून होऊ नये. तसेच उशी, हातरुमाल, नॅपकिन , अंतर्वस्त्रे किंवा कोणत्याही पोशाखावर ध्वजाचे भरतकाम किंवा मुद्रण केले जाऊ नये.
3 राष्ट्रध्वजावर कोणतीही अक्षरे नसावीत.
4 काही गुंडाळण्यासाठी किंवा वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी राष्ट्रध्वज वापरू नये.
5 राष्ट्रध्वज कोणत्याही वाहनाची कोणतीही बाजू, मागील किंवा वरील भाग झाकण्यासाठी वापरू नये.
प्रश्न : खुल्या जागेत किंवा सार्वजनिक इमारतींवर राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्याची योग्य पध्दत कोणती ?
भारतीय ध्वज संहितेच्या भाग III, विभाग III अनुसार, जर राष्ट्रीय ध्वज सार्वजनिक इमारतींवर फडकावला असेल तर तो सर्व दिवशी कोणत्याही हवामानात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवला जावा. तो वेगाने वर चढवला जावा आणि संथपणे उतरवला जावा.
•जेव्हा राष्ट्रध्वज एखाद्या भिंतीवर सपाट आणि आडव्या पद्धतीने प्रदर्शित केला जातो तेव्हा केशरी पट्टा सर्वात वर असावा आणि जेव्हा उभ्या पद्धतीने प्रदर्शित केला जातो तेव्हा केशरी पट्टा राष्ट्रीय ध्वजाच्या उजव्या बाजूला असावा म्हणजेच तो समोर तोंड केलेल्या व्यक्तीच्या डावीकडे असावा.
•जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याकडून राष्ट्रध्वज आडव्या पद्धतीने किंवा खिडकी, सज्जामधून काही अंशांवर किंवा इमारतीसमोर प्रदर्शित होतो तेव्हा केशरी पट्टा कर्मचाऱ्यापासून दूरच्या टोकाला असावा.
प्रश्न : राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या अर्ध्यावर फडकवावा का ?
राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या अर्ध्यावर फडकवला जाऊ नये, अपवाद – अशा प्रसंगी जेव्हा भारत सरकारने सूचना दिल्या असतील. जेव्हा अर्ध्यावर फडकवला जात असेल तेव्हा राष्ट्रध्वज प्रथमतः स्तंभाच्या सर्वोच्च स्थानी नेऊन मग अर्ध्या स्थानापर्यंत आणला जावा. त्यादिवसाच्या अखेरीस ध्वज उतरवण्यापूर्वी तो पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी चढवला जावा.
प्रश्न : मी माझ्या वाहनावर राष्ट्रध्वज लावू शकतो/शकते का ?
भारतीय ध्वज संहिता, 2002 च्या परिच्छेद 3.44 अनुसार मोटरगाड्यांवर राष्ट्रध्वज लावण्याचा विशेषाधिकार पुढे उल्लेख केलेल्या मान्यवरांपुरता मर्यादित आहे.
राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
राज्यपाल आणि नायब राज्यपाल
भारतीय मोहिमा/पदांवरील प्रमुख
पंतप्रधान
केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री
एखाद्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री
लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, लोकसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे विधानपरिषद सभापती, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे विधानसभा अध्यक्ष, राज्यांचे विधानपरिषद उपसभापती, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे विधानसभा उपाध्यक्ष
भारताचे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती
प्रश्न :भारताचा राष्ट्रध्वज इतर देशांच्या ध्वजासोबत कसा प्रदर्शित केला जावा ?
भारतीय ध्वज संहितेच्या परिच्छेद 3.32 अनुसार, जेव्हा राष्ट्रध्वज इतर देशांच्या ध्वजांसोबत सरळ रेषेत प्रदर्शित होत असेल तर राष्ट्रध्वज सर्वात उजवीकडे असावा. इतर देशांचे ध्वज इंग्रजी अक्षराच्या सहाय्याने देशांच्या नावानुसार अकारविल्हे लावले जावेत.