विशाखापट्टणम येथील शिखर परिषदेत सीईओ रुबल अगरवाल यांनी स्वीकारला पुरस्कार 

पुणे : राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक श्रेणीतील प्रकल्प पुरस्कार नुकताच पुणे स्मार्ट सिटीला प्रदान करण्यात आला. स्मार्ट आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या स्मार्ट क्लिनिक प्रकल्पासाठी पुणे शहराचा स्मार्ट सिटीज इंडिया पुरस्कारांमध्ये गौरव करण्यात आला आहे.

विशाखापट्टणम येथे स्मार्ट सिटींच्या शिखर परिषदेत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.

देशातील स्मार्ट सिटींनी विविध श्रेणींअंतर्गत राबविलेले प्रकल्प व उपक्रमांद्वारे केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळावी व त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड’ स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये पुणे स्मार्ट सिटीने पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे.

पुणे स्मार्ट सिटीने बाणेर येथे मागील वर्षी पहिले स्मार्ट क्लिनिक सुरू केले. या स्मार्ट क्लिनिकच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. यामुळे नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विनामूल्य औषधे पुरविण्याबरोबरच काही महत्त्वाच्या चाचण्या अनुदानित दराने येथे केल्या जातात. आरोग्य सेवा पुरविण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य सेवा उपक्रमांचे एकात्मीकरण करण्याचे या प्रकल्पाअंतर्गत विचाराधीन आहे.

पुरस्कार स्वीकारल्यावर पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, “स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता व सन्मान मिळणे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत आणखी लोकोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रेरणा मिळणार आहे.”

स्मार्ट क्लिनिकची वैशिष्ट्ये

१) आरोग्याबाबत जागरुकता आणि सामाजिक असमानता कमी करणे

२) लोकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन लोकांच्या जवळ आरोग्यसेवांचे नियोजन करणे (सेवा वितरणात सुधारणा)

३) स्मार्ट क्लिनिक्स पोर्टेबल कॅबिन्समध्ये किंवा अस्तित्वात असलेल्या सरकारी संरचनांमध्ये बांधण्यात येतील, त्यामुळे ते लहान जागा व्यापतील. परंतु दररोज 100 पेक्षा अधिक रुग्ण हाताळतील आणि काही चाचण्यांसाठी लॅब सुविधा आणि आवश्यक औषधे विनामूल्य प्रदान करतील.

स्मार्ट क्लिनिक प्रकल्पामध्ये एक कार्यक्षम व सर्वांना सुलभ अशी आधुनिक व्यवस्था असणारे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र तथा स्मार्ट क्लिनिकची उभारणी करण्यात आली आहे. स्मार्ट क्लिनिकची उभारणी केल्याने त्याद्वारे इतर रुग्णालयांवरील पडणारा बोजा कमी होईल आणि नागरिकांना आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक मदत मिळेल.