पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे, सत्ताधारी व मर्जीतील ठेकेदारांच्या संगनमताने माध्यमिक शिक्षण विभागातील फर्निचर साहित्य खरेदीचे काम थेट पध्दतीने ठेकेदांराना देण्यात आले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ठेकेदारासोबत करारनामा करण्याची प्रक्रीया रद्द करून, कामाचा पुरवठा आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात येवू नये व त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत खैरनार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एखादा ठेकेदार पूर्वी काम करत असेल तर त्यालाच नवे काम, कोणतीही निवीदा प्रक्रीया न राबविता देण्याचा नवा पायंडा महापालिकेत अलिकडच्या काही काळापासून सुरू करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय विभागाने विना निविदा कामे करू नयेत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असताना देखील मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विना निवीदा कामे देण्याचा घाट घातला जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी नव्याने प्रथा पाडण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील फर्निचर साहित्य खरेदीत दोन ठेकेदार मित्रांना विभागून काम देण्यात आले आहे. नव्याने निविदा प्रक्रिया न राबविता सुमारे 31 लाख रुपयांची खरेदी करण्यात येणार आहे. या कामाला बुधवारी (दि.22-01-2020 रोजी) स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.

महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने टेबल, खुर्च्यां, कपाट यासह अन्य फर्निचर साहित्याची मागणी भांडार विभागाकडे केली आहे. तत्पुर्वी वैद्यकीय विभागाच्या विविध प्रकारच्या फर्निचर साहित्याची खरेदी जीईएमवर निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली होती. त्यानूसार प्राप्त लघुत्तम पुरवठादार मे. रेखा इंजिनिअरिंग वर्क्स, चिंचवड यांना एकूण 5 बाबींच्या फर्निचर साहित्यासाठी 31 लाख 7 हजार 920 रुपये व मे. निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन पिंपरी यांना 6 बाबींच्या फर्निचर साहित्यासाठी 31 लाख 37 हजार 937 रुपये पुरवठा आदेश देण्यात आलेले होते. त्यानूसार संबंधित पुरवठादार यांनी आदेशातील नमुद साहित्याचा पुरवठा केलेला आहे. त्यामुळे भांडार विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया न राबविता, त्याच ठेकेदारांना पुन्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या फर्निचर साहित्य खरेदी करण्याचे काम विभागून देण्यात आले आहे. वैद्यकीय विभागाच्या निविदेच्या मंजूर दरानूसार मे. रेखा इंजिनिअरिंग वर्क्स यांना 5 प्रकारच्या फर्निचर साहित्याच्या खरेदीसाठी 15 लाख 52 हजार 610 रुपये आणि मे. निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन यांचेकडून 6 प्रकारच्या फर्निचर साहित्य खरेदीसाठी 15 लाख 65 हजार 580 रुपये असा एकूण 31 लाख 18 हजार 190 रुपये खर्च येणार आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाने फर्निचर साहित्य खरेदी करण्यासाठी भांडार विभागाने सदरील दोन ठेकेदारांना मागील निविदेच्या दरानूसार काम दिले असून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची तसदी घेतलेली नाही. तसेच वरील दोन्ही ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता घेतलेली आहे.

या माध्यमातून विनास्पर्धा निवीदा प्रक्रीया राबविली न गेल्याने सर्वसामान्य करदात्या नागरीकांच्या लाखो रूपयांची उधळपट्टी होत आहे. ठेकेदार पोसण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीला सुरूंग लावला जात आहे. स्थायी समितीने बहुमताच्या जोरावर कामे न करता नियमाप्रमाणे कामे करने गरजेचे आहे. तसेच या अनियमिततेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून नव्याने स्पर्धात्मक निवीदा प्रक्रीया राबविण्यात यावी, अन्यथा महापालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी दिला आहे.