नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या उद्दिष्टावर केंद्र सरकार काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. पंजाबमधील मोहाली येथील, साहिबजादा अजित सिंघनगर इथं उभारण्यात आलेल्या होमी भाभाकर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. ३०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालय उभारणीला अंदाजे ६८४ कोटी रुपये खर्च आला आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या अंतर्गत, केंद्र सरकार जिल्हा स्तरावर ६४ हजार कोटी रुपये खर्च करून आधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं. याआधी देशात, भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या केवळ ७ शाखा होत्या, आता ही संख्या वाढून २१ हून अधिक झाली आहे असं पंतप्रधान पुढे म्हणाले.
रूग्णालयाइतकीच त्यातील डॉक्टरांची भूमिकाही महत्वाची असते, असं सांगत, सरकारने आतापर्यंत ५ लाख आयुष डॉक्टरांना अलोपेथिक डॉक्टर म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री भगवंत मान, केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग आणि अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते काल, हरियाणामधील फरिदाबाद इथं माता अमृतानंदमयी ट्रस्टच्या अमृता रूग्णालयाचं उद्घाटनं करण्यात आलं. हे रुग्णालय आशिया खंडातील सर्वात मोठं रूग्णालय असून यात अंदाजे सव्वीसशे खाटांची सोय आहे.