पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती

मुंबई : सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना 2011 च्या लोकसंख्येऐवजी यापुढे सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

टँकरने पाणीपुरवठा करताना सध्या प्रचलित पद्धतीने 2011 ची लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे लोकसंख्येत वाढ झालेली असल्याने अपुरा पाणीपुरवठा होत होता. याबाबत लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार सध्याच्या लोकसंख्येचा घटक विचारात घेण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ग्रामीण भागात प्रतिमाणसी 20 लिटर पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय पशुधनासाठीही सुव्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या जनावरांसाठी प्रति जनावर प्रतिदिन 35 लिटर, वासरांसाठी (लहान जनावरे) 10 लिटर तर शेळ्या मेंढ्यांसाठी 3 लिटर इतका दैनंदिन पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत, असेही श्री. खोत यांनी स्पष्ट केले.