नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्र महोत्सव नारीशक्तीचा उत्सव असून राणी अंबिका देवी आणि रानी चन्नम्मा यांनी परकीय साम्राज्याविरोधात निकराचा लढा दिला होता असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांनी आज म्हैसूरुच्या चामुंडी हिल्स इथं १० दिवसांच्या म्हैसुरू दसरा महोत्सवाचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाचं कर्नाटकच्या दौऱ्यावर आल्या आहेत.
प्राचीन काळापासून संतांनी समाजाला उत्सवांच्या माध्यमातून एकत्र केलं आणि एकमेकांशी जोडलं आणि योग्य मार्गावर जाण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केलं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते. आज त्यांचा हुबळी आणि धारवाड महानगरपालिकांद्वारे सत्कार होणार आहे. त्यानंतर त्या धारवाडच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन संकुलाचं उद्घाटन करतील.