नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सण उत्सवांच्या काळात “वोकल फॉर लोकल” मोहिमेला अधिक गती देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी “वोकल फॉर लोकल” हा संकल्प आपण गेल्या काही वर्षांपासून केला आहे; आता या मोहिमेला अधिक गती द्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खादी, हातमाग, हस्तकला वस्तू यासह स्थानिक वस्तू अवश्य खरेदी करा; असं पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेत, त्यांच्या आदर्शांना अनुसरून त्यांच्या स्वप्नांमधला भारत घडवणं हीच स्वातंत्र्य सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मोदी म्हणाले. येत्या 28 सप्टेंबरला वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. 28 सप्टेंबरलाच केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून देत देशातील प्रत्येक तरुणानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित विशेष प्रसंग अभिनव पद्धतीनं साजरे करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. प्रखर मानवतावादी, चिंतक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून मोदी म्हणाले की पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदय हे संपूर्ण भारतीय विचार मांडले. त्यांच्या विचारातून देशाला आणखी पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल.
भारतात चित्ता पुन्हा आल्याबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला; भारताचं निसर्गाप्रती असलेलं प्रेमच त्यातून व्यक्त झालं, असं पंतप्रधान म्हणाले. 5 जुलै ते 17 सप्टेंबर या कालावधीत राबवलेल्या स्वच्छ सागर – सुरक्षित सागर या मोहिमेचा उल्लेखही त्यांनी केला.
नुकत्याच झालेल्या सांकेतिक भाषा दिनाच्या अनुषंगानं या संदर्भात होत असलेल्या प्रयत्नांची माहिती काल पंतप्रधानांनी दिली. श्रवण विकलांग बंधू भगिनींसाठी 2015 मध्ये स्थापित भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रानं दहा हजार शब्द आणि हावभावांचा कोष तयार केला आहे. या भाषेचे मानदंड राखण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणात बरेच बदलही केले आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. ब्रेल लिपिमध्ये लिहिलेल्या आसामी भाषेतील सर्वात जुन्या हेमकोषाबद्दल बोलताना ते म्हणाले.