नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतूनं भाजपा सरकार कार्यरत असून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवनव्या सुधारणा करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
गुजरात दौऱ्याच्या आजच्या शेवटच्या टप्प्यात गुजरात प्रदेश भाजपातर्फे राजकोट जिल्ह्यात जामकंडोरणा इथं आयोजित मेळाव्याला ते संबोधित करत होते. गेल्या २० वर्षात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गुजरातमधे विकसित केलेल्या वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रदेश भाजपा तर्फे या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांना महात्मा गांधींची चांदीची मूर्ती भेट देण्यात आली.
या दौऱ्यात आज प्रधानमंत्री अहमदाबादमधे असर्वा इथं शासकीय रुग्णालयातल्या बाराशे पंचाहत्तर कोटी रुपये खर्चून उभारलेल्या वैद्यकीय सुविधांचं लोकार्पण करणार आहेत. यात अद्ययावत हृदय शस्त्रक्रीया आणि संशोधन केंद्र, मूत्रपिंड विकार उपचार रुग्णालय, कर्करोग रुग्णालय तसंच गरीब रुग्णांसाठी आणि त्यांच्या परिवारांसाठी विश्राम गृह इत्यादींचा समावेश आहे.