नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले असून महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा आरोप काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो पदयात्रेत नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीमधल्या चौक सभेत ते आज बोलत होते. सहा  वर्षापूर्वी नोटबंदी झाली,  त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीनं देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्सुनामी आली. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली, अशी टीकाही गांधी यांनी केली. सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना विकले जात असून सरकारी नोक-या नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅस महाग झाले.  जनतेचा आवाज मोदी सरकार ऐकत नाहीत.  देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पहात आहे पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फेरलं आहे, असं गांधी यांनी सांगितलं. दरम्यान, पत्रकारांशी नांदेड इथं संवाद साधताना काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश म्हणाले की, केंद्र सरकार ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केवळ विरोधी पक्षातील लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठी, त्यांचा छळ करण्यासाठी केला जात आहे. विरोधी पक्षांनी वारंवार केंद्रीय यंत्रणांचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर केला जात असल्याबद्दल आवाज उठवला आहे. संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना पीएमएलए कोर्टानं ईडीच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.